Republic Day: २६ जानेवारी हा कोणता दिवस?....विद्यार्थी म्हणतात, ‘स्वातंत्र्यदिन’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:14 PM2022-01-25T21:14:52+5:302022-01-25T21:15:36+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वभूमीवर सातवी ते नववी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारले प्रश्न

What day is 26th January Students say Independence Day in sarve | Republic Day: २६ जानेवारी हा कोणता दिवस?....विद्यार्थी म्हणतात, ‘स्वातंत्र्यदिन’

Republic Day: २६ जानेवारी हा कोणता दिवस?....विद्यार्थी म्हणतात, ‘स्वातंत्र्यदिन’

Next

नम्रता फडणीस

पुणे : प्रश्न : २६ जानेवारी हा दिवस कोणता?
        विद्यार्थी : स्वातंत्र्यदिन.
        प्रश्न : मग १५ ऑगस्टला काय असते?
       विद्यार्थी : तोही स्वातंत्र्यदिनच.
       प्रश्न : २६ जानेवारीच्या दिवशी काय केले जाते? का साजरा केला जातो?
       विद्यार्थी : ध्वजवंदन. कामगार दिवस पण असल्याने सर्वांना सुटी असते.

ही उत्तरे वाचून थक्क झालात ना! असे काही प्रश्न उद्या (दि. २६) साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या पाश्वभूमीवर सातवी ते नववी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही विचारले. मात्र, त्यातील दहापैकी दोनच मुलांना प्रश्नांची तोडकी मोडकी उत्तरे देता आली. प्रजासत्ताक दिन असे मराठीत विचारल्यानंतर इंग्रजी माध्यमातील मुले एकमेकांकडे बघायला लागली. त्यांना इंग्रजीमध्ये ‘रिपब्लिक डे’ असं सांगितल्यानंतर त्यांच्या प्रश्न लक्षात आला. मात्र तो साजरा का करतात त्याचे उत्तर देता आलं नाही. त्यामुळे मुलांना शाळेत नक्की काय शिकविले जाते? असा प्रश्नच उपस्थित होत आहे.

१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिन) हे दोन राष्ट्रीय दिवस आहेत. या दिवसांचे महत्त्व आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे ही शाळांबरोबरच पालकांचीही जबाबदारी आहे. मात्र जिथे पालकच या दोन दिवसांबाबत अनभिज्ञ असतील तिथे मुलांना तरी कुठून दोष देणार? त्याच मुलांच्या पालकांनाही हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनाही त्याचे उत्तर सांगता आले नाही.

सुजाण नागरिक घडविण्याचे संस्कार खऱ्या अर्थाने शाळेतूनच मिळतात. ज्या देशात आपण राहतो त्याचे राष्ट्रगीत, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन याची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यकच आहे. पण दुर्दैव हे आहे की शालेय विद्यार्थी तर सोडाच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही प्रजासत्ताकदिन का साजरा करतात, याचे उत्तर देता आले नाही. मग आपण विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या प्रकारचे शिक्षण देत आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ शालेय प्रशासनावर आली आहे.

लोकमत सर्वेक्षण

- ५० विद्यार्थी आणि पालकांशी साधला संवाद

- सातवी ते नववी २०, महाविद्यालयीन २० आणि पालक १०

- प्रजासत्ताक दिन साजरा का करता - ३० जणांना बरोबर उत्तर सांगता आले नाही

- चुकीचे उत्तर - शालेय विद्यार्थी ७, महाविद्यालयीन विद्यार्थी ५, पालक ८

Web Title: What day is 26th January Students say Independence Day in sarve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.