न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट
By किरण शिंदे | Updated: May 26, 2025 15:52 IST2025-05-26T15:51:04+5:302025-05-26T15:52:30+5:30
आमचं दुःख आणि त्यांच दुःख काही वेगळं नाही, घरातला माणूस सोडून जात असेल, तर ते भोग आहेत ते कुणाच्याच नशिबी येऊ नये

न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट
पुणे: मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे वैष्णवी हगवणे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कस्पटे येथील निवासस्थानी गेले होते. त्यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी न्यायासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, आंदोलन करावे लागेल म्हणत कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला.
धनंजय देशमुख म्हणाले, आमचं दुखणं एवढं मोठं आहे. त्यामुळे याची आम्हाला कल्पना आहे. दुःख सहन करत पुढे कशी वाटचाल करावी लागते याविषयी मी त्यांच्याशी चर्चा केली. आमचं दुःख आणि त्यांच दुःख काही वेगळं नाही. घरातला माणूस सोडून जात असेल. तर ते भोग आहेत ते कुणाच्याच नशिबी येऊ नये. त्यांना भेटायला येणाऱ्या सगळ्या लोकांनी या काका काकू सोबत एक नऊ महिन्याचं बाळ आहे. त्यामुळे या दुःखातून कसं सावरायचं याचं बळ त्यांना द्यावं
घरी बसून आपल्याला न्याय मिळत नाही
आम्ही देखील त्याच परिस्थितीतून जात आहोत ते सुद्धा त्याच परिस्थितीमधून जात आहे. दुःख कधी कुणाचं कमी होत नसतं. हे सगळे भोग आपल्याला भोगावे लागतात आपण काय इतकं पाप केलं होतं या सगळ्या गोष्टी आपल्या भोगायला आल्या याचा विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायला ईश्वराने त्यांना बळ द्यावं. जे पीडित कुटुंब आहेत मग ते देशमुख कुटुंब असो किंवा कस्पटे कुटुंब असो दुःख तर झालेल आहे. आपले दोन माणसं आपल्याला सोडून गेलेले आहेत. मात्र परीक्षा तर याच्यापुढे आहे. न्यायालयाची पायरी चढताना आपल्याला सगळं सिद्ध करायचं आहे. त्याच्यातूनच आपल्याला न्यायाची अपेक्षा करावी लागेल. आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला अहिंसेच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने योग्य दिशा कशी शोधता येईल हे पाहिले पाहिजे. कारण घरी बसून आपल्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर जाव लागत उपोषण, आंदोलन करावे लागते.
न्यायाची लढाई म्हणायला पाहिजे
या सगळ्या परिस्थितीतून माझं गाव माझे कुटुंब सगळ्या जाती धर्मातील लोक गेलेले आहेत. या लढाईला खरं तर न्यायाची लढाई म्हणायला पाहिजे. कारण निष्पाप लोकांना मारलं जातं याला न्याय मागणं कसं म्हणता येईल. माझ्या भावाने किंवा वैष्णवी ताईने काय पाप केलं होतं की, त्यांना कायमचं आपल्या लेकरांना आणि कुटुंबाला सोडून जावं लागलं. न्याय मागण्यासाठी आपल्याला त्या प्रक्रियेत यावे लागेल. आणि न्याय घ्यावा लागेल.