पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमच्या नेत्यांनी जाहीर केल्यानुसार आम्ही पुण्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पावसाळी कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी निवडणुकीवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांना विचारलेल्या प्रश्नावर
मोहोळ म्हणाले, निवडणुकीसंदर्भात आमच्या नेतृत्वांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहे, त्यादृष्टीने निवडणूक तयारी सुरू केली आहे. गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाणार आहे. पुण्यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, तुम्ही विद्यमान नगरसेवक असलेल्या १०५ जागा सोडून त्याच्या पुढे बोलणी करणार आहोत का, स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे की नाही, या प्रश्नांवर मात्र मोहोळ यांनी काहीही उत्तरे दिली नाही.