Pahalgam Terror Attack: हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही ७ किलोमीटरवर; चालकाने जागेवरच थांबायला सांगितले, पुण्याच्या पर्यटकाची हकीकत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:07 IST2025-04-23T18:06:49+5:302025-04-23T18:07:24+5:30
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले

Pahalgam Terror Attack: हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही ७ किलोमीटरवर; चालकाने जागेवरच थांबायला सांगितले, पुण्याच्या पर्यटकाची हकीकत
उरुळी कांचन(पुणे) : घटना घडली त्या ठिकाणापासून अलीकडे ७ किलोमीटर अंतरावर आम्ही होतो. आमच्या ग्रुप मधील एका इनोव्हा चार चाकी चालकाने प्रसंगावधान राखून फोन करून आम्हास जागेवर थांबायला सांगितले. अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या समशेर शेख यांनी दिली. उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे येथील पहलगाम पर्यटनासाठी गेलेले समशेर शेख व त्यांची पत्नी शाईन, मुलगा सिद्दिक हे श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मागील पाच दिवसांपूर्वी ज्योती झुरुंगे या महिलेने एकूण ७० नागरिक पर्यटनासाठी सर्व व्यवस्थापन करून नेले होते. सर्वजण रेल्वेने जाऊन तेथील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी तेथील स्थानिक चार चाकी वाहनाने पर्यटन स्थळ पाहत होते. २५ तारखेला त्यांचे रेल्वेची परतीची तिकिटे आरक्षित होती.
समशेर शेख यांनी सांगितलेली कहाणी अशी की, ७० पर्यटक हे शिरूर दौंड हवेली अशा तालुक्यातून गेलेले होते. ग्रुप करून चार चाकी वाहनामध्ये पर्यटन स्थळ पाहायला जात असताना दहशवादी हल्ला झाल्याची घटना घडली. त्या ठिकाणापासून सात किलोमीटर अलीकडे अंतरावर होती. व त्यांच्याच ग्रुप मधील एक गाडी घटनेच्या एक किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. दुसऱ्या गाडीच्या चालकाने जेव्हा घटना घडली त्या ठिकाणापासून लोकांचे धावपळ, व चार चाकी गाड्या थांबल्याचा अंदाज आला. दुसऱ्या गाडीच्या शेजारी थांबलेल्या एका गाडीतील ड्रायव्हरने लगेचच खुणावले व परत फिरण्यास सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले. व लगेचच आम्ही असलेल्या चार चाकी गाडीतील चालकाला फोन करून सांगितले की, पुढे येऊ नका या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.
आम्ही लगेचच गाडी जागेवर थांबवली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती सुरक्षित पाठवल्या. आमच्या पुढच्या ग्रुपमधील वाहनचालकाने लगेचच फोन करून सांगितल्यामुळे आम्ही बचावलो व पुढील अनर्थ टळला. माझे माझ्या घरच्यांशी संपर्क चालू आहे. आम्ही सुरक्षित आहोत. मला माझे वडील अब्दुल गफूर व आई सलीमा शेख यांनी संपर्क केला. आमचे बोलणे झाल्यानंतर ते सर्व चिंतामुक्त झाले.
माझा भाऊ समशेर शेख व त्याची पत्नी व मुलासह रेल्वेने ५ दिवसापूर्वी पर्यटनासाठी गेले होते. परंतु घटना घडली त्या दिवशी बातम्यांमधून मधून जेव्हा ही घटना समजली तेव्हा मी व माझे आई-वडील आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आम्ही लगेचच भाऊ समशेर याला फोन केला व तो आमच्याशी बोलला आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती पाठवून दिले आहेत व आम्ही लवकरच घरी येऊ. आई वडील त्यांच्याशी बोलले व आम्ही सर्व चिंतामुक्त झाले.- युनुस शेख, पर्यटक समशेर शेख यांचा भाऊ