जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:21 IST2025-10-01T13:21:26+5:302025-10-01T13:21:53+5:30
पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही

जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी
पुणे : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, संसदेनेही तसा ठराव केला आहे. जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी दिला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि उत्तरही कोणी देत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याला पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची संधी होती. गुजरात ते काश्मीर सर्व सीमांवर पाकचे ड्रोन होते. पाकला अद्दल घडवावी, अशी संपूर्ण देशाची भावना होती. मात्र, आपण अचानक शस्त्रसंधी का केली, असा सवाल ओवेसी यांनी केला.
ओवेसी म्हणाले, दिल्लीत बसून एक जादुगार जादूचे प्रयोग करत आहे. आता सर्वांना त्यात आनंद वाटत असला, तरी यात दोन पिढ्यांचे नुकसान झाले आहे. देशातील २५ टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालची आहे. लोकसंख्येच्या लाभांशाचे वरदान संपेल आणि या पिढ्या म्हाताऱ्या होतील, तेव्हा काय नुकसान झाले हे समजेल, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. महाराष्ट्रातील पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थिती पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्तांसाठी निधी का देत नाही? असा सवाल ओवैसी यांनी केला.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे, असे सांगून ओवैसी म्हणाले, सध्या विद्यार्थिदशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनवले जात आहे, एका धर्माविरोधात भडकावले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नसून सध्याचे सत्ताधारी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मुस्लिमांना धमक्या देणे, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवणे असे प्रकार घडत आहेत. डोक्यात हवा गेल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते लक्षात येत नाही. मुस्लिम समाजाला एका बाजूला सारून भारत विश्वगुरू होणार नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.