'आमचे ३००, ४०० कार्यकर्ते होते तयार; गडबड केल्यावर जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं', गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:27 IST2022-02-18T15:57:30+5:302022-02-18T16:27:54+5:30
माझ्या घराजवळ आंदोलन होणार असल्यामुळे भाजपचे ३००, ४०० कार्यकर्ते एकत्र जमले होते

'आमचे ३००, ४०० कार्यकर्ते होते तयार; गडबड केल्यावर जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं', गिरीश बापट
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरवला. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात चक्क खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने "माफी मांगो" आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, जोरसे बोल हल्ला बोल, अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर दिले आहे. भाजपचेही ३०० ते ४०० कार्यकर्ते तयार होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही गडबड केली असती. तर त्यांना जशास तसे प्रत्यत्तर दिल असल्याचे बापट यांनी सांगितलं आहे.
बापट म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे वीस-बावीस कार्यकर्ते जमा झाले होते. पण माझ्या घराजवळ आंदोलन होणार असल्यामुळे भाजपचे ३०० ते ४०० कार्यकर्ते एकत्र जमले होते. परंतु मीच त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं होतं.. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर काही गडबड केली असती तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं.
भ्रष्टाचारी लोकांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही
किरीट सोमय्या सत्काराच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारात गोंधळ घातला. त्यावेळी पुणे पोलिसांनाही त्यांना शांत करता आलं नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडून भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर बोलताना बापट म्हणाले, भाजपचे 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. कारण हे आमचं व्यक्तिगत काम नाही. आम्ही समाजासाठी काम करत असतो. भाजप कोरोनाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काम करता आहे. त्या लोकांना आम्ही आत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही बापट यांनी यावेळी दिला आहे.