सासवड : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आमची जमीन द्यायचीच नाही, आम्हाला तुमचा प्रकल्प नको आहे. मात्र, शासन एकएक आदेश काढीत आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, तसेच सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, ड्रोन अथवा पीक पाहणी करू देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर सोमवारी (दि. २८) प्रकल्पबाधित शेतकरी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेणार असून, विमानतळ प्रकल्पाला प्रखर विरोध करून शासनाचा निषेध केला जाणार आहे.
विरोध असताना जमीन संपादित कशी करता, प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपजिल्हाधिकारी नियुक्त केले असून, त्यांच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात येणार असून, शेतकऱ्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याविरोधातही शेतकरी आक्रमक झाले आहेत. आमचा विरोध असताना आमच्या हक्काची जमीन संपादित कशी केली जाऊ शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत प्रकल्पबाधित गावच्या शेतकऱ्यांनी पारगाव येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्याचे ठरविण्यात आले.