आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 20:03 IST2025-04-17T19:59:58+5:302025-04-17T20:03:53+5:30
रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांचं 'स्वागत', बॅनरमुळे चर्चेला उधाण

आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
पुणे : “माझी ईडी चौकशी झाली, माझ्या कंपन्यांच्या चौकशा केल्या गेल्या. पण, आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू,” अशा शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नावाने लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतफलकाबाबत खुलासा केला. कर्जत नगरपंचायतीमधील (जि. अहिल्यानगर) सत्ताबदलावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विधानसभेचे सभापती राम शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यात हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रम होता. रोहित पवार तिथले आमदार आहेत. त्यांच्या नावाने उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत करणारे फलक मतदारसंघात लावण्यात आले होते. रोहित यांनी सायंकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. ते उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय माझे काका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने स्वागताचे फलक लावले यात गैर काहीही नाही. याचा अर्थ मी लगेचच भूमिका बदलली असा होत नाही. कंपनीची, माझी चौकशी झाल्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, शरद पवार यांच्याबरोबरच आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, असे ते म्हणाले.
कर्जत पंचायतीबाबत ते म्हणाले, “हे सरकार कसे काम करीत आहे, सत्तेशिवाय त्यांना कसे काहीच दिसत नाही याचे उदाहरण कर्जत पंचायतीवरून दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तिथे आमच्या विचाराच्या नगरसेवकांची सत्ता आली. भाजपचे दोनच नगरसेवक होते. तिथे अध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अशा ठरावाच्या कार्यवाहीची विशिष्ट पद्धत आहे. कोणासमोर याची सुनावणी व्हावी हे निश्चित आहे; मात्र, सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलली गेली.” ‘विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठिंब्याने हे झाले,’ असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात लक्ष घातले होते, असे ते म्हणाले. पद्धतच बदलायची म्हणून त्यांनी विशेष अध्यादेश काढला, असे रोहित पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत यामागेही सरकारच आहे, सत्तेचे केंद्रीकरण व्हावे, लोकल बॉडी नसावी, असा सरकारचा विचार आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपले राजकारण पुढे जाणार नाही, हे भाजपच्या एका मोठ्या नेत्याला माहिती आहे. पण, त्यांना आपण फार सोज्वळ आहोत, विचारवंत आहोत, असे दाखवायचे असते. त्यामुळे त्यांनी काही जणांना पाळले आहे, ते भुंकतात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जात आहेत याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, अशा प्रवेशांमुळेच त्यांच्या मूळच्या लोकांना साधी मंत्रिपदे मिळाली आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन यांची उदाहरणे आहेत. त्यांनी एकदाच काय ते सर्वांना झाडुनपुसून घ्यावे, म्हणजे आम्हालाही नव्यांना संधी देता येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेचा निकाल व पुढची परीक्षा यात किमान ४५ ते ६० दिवसांचा कालावधी असावा, असे परीक्षार्थींचे म्हणणे होते. ते सरकारने ऐकून घेतले नाही. मुख्यमंत्री त्यांना भेटलेच नाहीत. मुले पवार साहेबांकडे गेली. साहेबांनी आयोगाला सांगितले. त्यांनी माहिती घेत, चर्चा करून मुलांचे म्हणणे मान्य केले. यात कोणाची कशाला हरकत आहे.