पुण्याच्या प्रवेशद्वारावर तोडपाणी; तंबाखूजन्य पदार्थांची एन्ट्री सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:33 IST2025-08-03T12:32:45+5:302025-08-03T12:33:24+5:30

- उपनगरामधील गोडाऊन बनली साठवणुकीचे केंद्र, जुजबी कारवाईने तस्करांना मिळाले प्रोत्साहन

Watertightness at Pune's entrance; entry of tobacco products made easy | पुण्याच्या प्रवेशद्वारावर तोडपाणी; तंबाखूजन्य पदार्थांची एन्ट्री सुलभ

पुण्याच्या प्रवेशद्वारावर तोडपाणी; तंबाखूजन्य पदार्थांची एन्ट्री सुलभ

- दुर्गेश मोरे

पुणे:
 शहरात तंबाखूजन्य पदार्थांची, विशेषत: गुटख्याची राजरोसपणे विक्री होत आहे. गुटख्यावर बंदी असतानाही तो सहज उपलब्ध होत असून, यावर ठोस कारवाईचा अभाव जाणवतो. याला अप्रत्यक्षपणे पोलिसांचे पाठबळ असल्याचा संशय आहे.

काही महिन्यांपूर्वी सोलापूरवरून येणारा तंबाखूजन्य पदार्थांचा मार्ग बदलला असून, आता सासवड-पानशेत-पुणे, सासवड-दिवे-हडपसर आणि नगर-वाघोली मार्गे पुण्यात मालाची तस्करी होत आहे. प्रवेशद्वारांवर होणाऱ्या 'तोडपाण्या'मुळे विद्येच्या माहेरघरात तंबाखूजन्य पदार्थांची एन्ट्री सुलभ झाली आहे.

शहरातील अनेक चहाच्या टपऱ्या आणि किराणा दुकानांवर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ सर्रास विकले जात आहेत. विशेष म्हणजे, रात्रगस्त घालणारे काही पोलीस कर्मचारीही या टपऱ्यांवर हौस भागवण्यासाठी येतात. काही वेळा पोलिसांकडून जुजबी कारवाई होते, पण ठोस उपाययोजना दिसत नाहीत. यामुळे तस्करांचे मनोबल वाढले आहे.

बदलले मार्ग, पण सोलापूर केंद्र कायम

पूर्वी कर्नाटकातून सोलापूर मार्गे पुण्यात तंबाखूजन्य पदार्थ येत होते. लोणीकाळभोर येथील प्रवेशद्वारावर तोडपानी केल्यानंतर मालाला शहरात प्रवेश मिळायचा. मात्र, व्यापाऱ्यांनी आता मार्ग बदलले असून, सासवड-दिवे-हडपसर, सासवड-पानशेत आणि नगर-वाघोली मार्गे तस्करी सुरू आहे. सोलापूर येथील केंद्र मात्र आजही कार्यरत आहे. याशिवाय, कोल्हापूर-पुणे आणि सासवड-मरीआई घाट-खेड शिवापूर-कोंढणपूर-पानशेत-धायरी मार्गेही माल येतो.
 

सासवडमधील ट्रक प्रकरण

जून महिन्यात सासवड येथे गुटख्याचा एक ट्रक पकडला गेला, जो पुण्यात येत होता. या प्रकरणात लोणीकाळभोर आणि राजगड पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी ट्रक सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणांहून फोन आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, पण मालाचा नेमका आकडा उघड झाला नाही.

रेल्वेनेही तस्करी

पूर्वी सोलापूरवरून रेल्वेने गुटखा पुण्यात यायचा. चिठ्ठ्यांद्वारे मागणी नोंदवली जायची आणि त्यानुसार वाटप व्हायचे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे मार्ग बंद झाला, पण सोलापूर केंद्र अजूनही सक्रिय आहे.

सोलापूर कारवाईनंतर पुण्यात गोडाऊन वाढ

कर्नाटकातून हुबळी, निपाणी, कोल्हापूर मार्गे येणारा माल आता विजापूर-सोलापूर मार्गे पुण्यात येतो. सोलापूर येथे साठवणूक होऊन मागणीनुसार पुण्याला पुरवठा केला जातो. सोलापूरमधील एका मोठ्या कारवाईत सुमारे २० कोटींचा माल असल्याची चर्चा होती, पण केवळ २-३ कोटींचा माल हस्तगत झाल्याचे दाखवले गेले. या कारवाईनंतर पुण्याच्या उपनगरांमध्ये गोडाऊनची मागणी वाढली. वाघोली, फुरसुंगी, कोंढवा, बोपदेव, दिवे घाट, कात्रज, जांभूळवाडी, खेड-शिवापूर येथे गोडाऊनमध्ये माल साठवला जात आहे. यामुळे गोडाऊनचे भाडे ३० हजारांवरून दीड लाखांपर्यंत वाढले असून, काही ठिकाणी सुरक्षारक्षकही तैनात आहेत.

पोलिस आणि अधिकाऱ्यांचा सहभाग?

सोलापूर येथील कारवाईत अन्न व औषध प्रशासन (एफडीए)च्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. यांनीच पुण्यात मालाच्या तस्करीसाठी अनेक मार्ग खुले केल्याचा आरोप आहे. सोलापूर-भिगवन-कर्जत-नगर-शिरुर-शिक्रापूर-वाघोली-पुणे, सोलापूर-यवत-लोणीकाळभोर-पुणे आणि कर्नाटक-विजयापूर-पंढरपूर-फलटण-सासवड-बोपदेव घाट-पुणे असे मार्ग तयार झाले आहेत.

जुजबी कारवाई, मोठा प्रश्न

पोलिसांकडून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि तस्करीवर कारवाई होत असली, तरी ती नावापुरतीच आहे. लाखोंचा माल जप्त झाल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कोट्यवधींचा माल येत असल्याची माहिती आहे. यामुळे कारवाईचा फारसा परिणाम दिसत नाही. पुणे शहरात तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाई आणि कडक धोरणाची गरज आहे, अन्यथा विद्येच्या माहेरघराची प्रतिमा डागाळण्याची भीती आहे.

Web Title: Watertightness at Pune's entrance; entry of tobacco products made easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.