मंचर : शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) घोडनदी, उजवा कालवा, घोडशाखा कालवा आदींना वेळेवर पाणी सोडू असे आश्वासन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. बैठकीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे,शिवाजीराव लोंढे, सुनील बाणखेले, रविंद्र करंजखेले, महादू भोर, अंकित जाधव, निलेश थोरात, बाजीराव बारवे, उपसरपंच गोकुळ भालेराव, कमलेश वर्पे, प्रल्हाद कानडे, राहुल भालेराव, राजेंद्र भालेराव, ज्ञानेश्वर कानडे उपस्थित होते.विहिरींच्या पाणी पातळीत तसेच घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्याची पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाण्याअभावी पिके सुकू लागण्याचा धोका आहे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजनावरही परिणाम होईल. त्यामुळे धरणातून वेळेवर कालव्याला आणि घोडनदीत पाणी सोडावे अशी मागणी बारकू बेनके, विजय चासकर यांच्यासह वळती, नागापूर, जाधववाडी, थोरांदळे, लौकी, अवसरी खुर्द, शेवाळवाडी, अवसरी बुद्रुक आदी गावातील शेतकऱ्यांनी केली.