पुण्यात आता क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसह वॉटर स्पोर्ट्सला परवानगी: पालिका आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 18:01 IST2021-01-16T18:00:59+5:302021-01-16T18:01:10+5:30
मनोरंजन व करमणूक पार्कसह इनडोअर एंटरटेनमेंट अॅक्टिव्हीटी, पर्यटनस्थळे होणार खुली

पुण्यात आता क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसह वॉटर स्पोर्ट्सला परवानगी: पालिका आयुक्तांचा आदेश
पुणे : महापालिकेच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रबोधिनी/ स्पोर्ट्स अकॅडमी, वॉटर स्पोटर््स येत्या सोमवारपासून (दि. 18) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध क्रीडा उपक्रम घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.
यासोबतच यशदासारख्या शासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. वॉटर स्पोर्ट, नौकाविहारासारख्या वॉटर अॅक्टिव्हीटी पर्यटन संचलनालयाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सुरु राहणार आहेत. मनोरंजन व करमणूक पार्क, इनडोअर एंटरटेन्मेंट अॅक्टिव्हीटी आणि पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत. क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडा स्पर्धांकरिता क्रीडा व युवक कल्याण विभाग यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचना व आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी आदेशामध्ये नमूद केले आहे.