पुणे: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबईच्या दरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटीसह इतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या दोन ते अडीच तास उशिराने पोहोचल्या, तर कायम वेळेवर धावणारी ‘वंदे भारत’लाही सीएसएमटीवर पोहोचायला दोन तास उशीर झाला. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामानिमित्त मुंबईत गेलेल्या नागरिकांना फटका बसला. पावसामुळे दिवसभरात वीस रेल्वे गाड्यांना उशीर झाला. एरवी जुलै महिन्यात पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होत असे; परंतु यंदा मे महिन्यातच पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले आहे.
रविवारपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी, रेल्वेची गती मंद झाली आहे, शिवाय कर्जत, ठाणे, दादर, चिंचपोकळी व इतर ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रेल्वेसेवा काही तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटीसह सर्व रेल्वे गाड्यांना सीएसएमटीत पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास उशीर झाला. त्यामुळे कामानिमित्त मुंबईला गेलेले नागरिक रेल्वेत अडकून पडले.
डेक्कन क्वीनला तीन तास झाला उशीर
पुण्यातून सकाळी मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटी आणि वंदे भारत या प्रमुख रेल्वे गाड्या आहेत. पावसामुळे सिंहगड एक तास उशिराने पोहोचल्या, तर डेक्कन क्वीन पावणेतीन तास, प्रगती तीन तास, पुणे-मुंबई इंटरसिटीला एक तास, तसेच वंदे भारतला दोन तास उशीर झाला आहे.
सोमवारी सकाळी पुण्यातून वेळेवर गाड्या निघाल्या; परंतु मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे सिंहगड, डेक्कन, प्रगती आणि वंदे भारतला उशीर झाला. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.