पुणे-नगर महामार्गावरील भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 18:57 IST2022-11-17T18:53:09+5:302022-11-17T18:57:32+5:30
या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक वारकरी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले

पुणे-नगर महामार्गावरील भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
रांजणगाव गणपती (पुणे) :पुणे नगर हायवेवर खंडाळे माथा (ता.शिरूर) हद्दीत आळंदीला पायी जाणाऱ्या दिंडीत खासगी प्रवासी बस धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक वारकरी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात गुलाब मोहदिन शेख (वय: ५९) रा. गोलेगाव यांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची फिर्याद प्रकाश संजय शिंदे (वय :२५) रा. गोलेगाव, ता. शिरूर यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोलेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा ही दिंडी नगर पुणे हायवेने आळंदीकडे जात असताना खासगी प्रवासी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस क्र.एम.पी.४१ पी.६६६३ हयगयीने अविचाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात खंडाळा गावचे हद्दीत नगर पुणे रोडवर घाट उताराला एका हॉटेलजवळ पालखी सोहळा दिंडीतील गुलाब मोहदिन शेख (वय :५९) रा. गोलेगाव, ता. शिरूर यांना धडक बसून गंभीर जखमी झाल्याने शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात बबन महादेव वाखारे( रा. गोलेगाव )यांच्या डोक्यास किरकोळ दुखापतीस कारणीभूत झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून बसचालक शिवकुमार विश्वास (वय:४३) (रा. होशंगाबाद,म. प्र.) यास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय सरजिने करीत आहेत.