Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:34 IST2025-01-05T16:34:16+5:302025-01-05T16:34:50+5:30
अशी मंत्रिपदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? असा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे.

Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...
Suresh Dhas Pune Speech: "वाल्मीक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी हे १७ मोबाईल नंबर वापरतात. वाल्मीक कराड शरण आल्यापासून नितीन कुलकर्णी फरार झाला आहे. पण माझी बीडच्या पोलीस अधीक्षकांना आणि सीआयडच्या डीजींना विनंती आहे की या नितीन कुलकर्णीला ताब्यात घ्या. कोणा-कोणाकडून किती पैसे घेतले आहेत ते तुम्हाला या १७ मोबाईल नंबरच्या तपासणीत सापडेल," असं आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस प्रशासनाला केलं आहे. ते पुण्यातील आक्रोश मोर्चात बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मंत्रिपदासाठी सुरेश धस राजकीय आरोप करत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे समर्थकांकडून केला जातो. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मंत्रिपदाचा काय संबंध? अशी मंत्रिपदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? त्याला माघारी आणून देणार असाल तर मी राजकारण सोडतो आणि तुम्ही सांगितलं तर कझागिस्तान किंवा गामा देशात जातो. देणार का माघारी आणून संतोषला?" असा संतप्त सवालही धस यांनी विचारला आहे.
"माझा हेतू काय आहे? मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर माझा बाप गेला होता. त्यानंतर सहा महिने मला तेल, मीठ, मिर्ची कशी आणतात हे कळत नव्हतं. संतोष देशमुखांच्या १०वीतील लेकराला आता कोणाचा आधार आहे? यात राजकारण कसलं आणलं? देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, हा माझा हेतू आहे," अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.