भिंत काेसळत असल्याचे लक्षात येताच मायलेक बाहेर पडल्याने थाेडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 20:31 IST2019-08-02T20:27:18+5:302019-08-02T20:31:47+5:30
पुण्यात जुन्या वाड्यांच्या भिंती पडण्याचे सत्र सुरुच असून गुरुवारी मध्यरात्री गणेश पेठ येथील एका वाड्याची भिंत काेसळली.

भिंत काेसळत असल्याचे लक्षात येताच मायलेक बाहेर पडल्याने थाेडक्यात बचावले
पुणे : गणेश पेठ परिसरातील बोरा हॉस्पिटलजवळ गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या एका जुन्या वाड्याची भिंत काेसळली. घराची भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात येताच आई आणि मुलगा बाहेर पळाल्याने ते या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. या दुर्घटनेत संबंधीत घरातील वस्तूंचे नुकसान वगळता इतर कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
ढोर गल्ली ७०२, गणेश पेठ येथे हा जुना वाडा आहे. तो मोडकळीस आला आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास एक भाग कोसळला. खालच्या मजल्यावर एक मुलगा आणि त्याची आई राहत होती. त्यांना भिंत कोसळणार असल्याचे वेळीच लक्षात आल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या घरपाडी विभागाने वाड्याचा उर्वरित धोकादायक भाग उतरविला. या वाड्याामध्ये गुंजकर कुटुंब राहत आहे. दरम्यान, या वाड्याच्या बाजूस एक धोकादायक जुना वाडा असून त्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक मुलासह राहत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.