पुण्यातील रस्त्यांवर वेगवान वाहनांमुळे चालणे मुश्किल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:24 IST2020-03-02T12:22:52+5:302020-03-02T12:24:31+5:30
रात्री चालणे असुरक्षित, अनेक भागात पदपथांची दुरवस्था

पुण्यातील रस्त्यांवर वेगवान वाहनांमुळे चालणे मुश्किल...
पुणे : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी, वाहनांचा वेग, बेशिस्तपणा, अपघात अशा विविध कारणांमुळे शहरातील रस्त्यांवरून चालण्याची भीती वाटत असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने अनेक महिलांनी पदपथावरून चालणे सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले. पथदिवे नसणे, लोकांचा दृष्टिकोन आदी कारणांमुळे रात्री चालणे असुरक्षित असल्याचेही काही महिलांनी स्पष्ट केले.
‘परिसर’ संस्थेने शहरातील एक हजार पादचाऱ्यांच्या सर्वेक्षणामध्ये सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला होता. अनेक भागात पदपथांची दुरवस्था असल्याने चालणे कठीण होते. पण, पदपथ चांगले असूनही आवश्यक सुविधा नसल्याने चालणे टाळत असल्याचे अनेकांनी सांगितले. विशेषत: त्यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. शहरातील रस्त्यांवरून चालणे असुरक्षित का वाटते, या प्रश्नावर सुमारे २५ टक्के जणांनी वाहनांच्या वेगाचे कारण सांगितले. तसेच, जवळपास तेवढ्याच जणांनी अपघातीची भीती व वाहनांची गर्दी खूप असल्याचे कारण दिले. बेशिस्त चालक व पदपथावर जागा नसल्याने असुरक्षित वाटत असल्याचेही काहींनी नमूद केले. सुमारे ३२.१ टक्के महिलांनी पदपथावरून चालणे सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले. दिवे नसल्याने रात्रीची भीती वाटते, लोकांचा दृष्टिकोन, गर्दी, चोरांची भीती अशी विविध कारणे महिलांनी दिली आहेत. पथदिव्यांचा मुद्दा १०.७ टक्के महिलांनी उपस्थित केला.
पदपथांवर सुविधा उपलब्ध करून दिल्यास चालणे कठीण जाणार नाही, असे बहुतेकांनी सांगितले. शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ७२.६ टक्के पादचाऱ्यांची आहे. जवळपास तेवढ्याच पादचाऱ्यांनी कचरापेटी व बसण्यासाठी बेंच-शेडची व्यवस्था असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच स्वच्छता, अडथळामुक्त रेलिंग, दिशादर्शक चिन्हे, सुशोभीकरणाची गरजही अनेकांनी व्यक्त केली आहे. चांगले पदपथ मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. या हक्कासाठी मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे मत सुमारे ८६ टक्के जणांनी व्यक्त केले आहे. 
.........
शहरातील रस्त्यांवरून चालणे असुरक्षित का वाटते?
कारण                           टक्केवारी 
वाहनांचा वेग                    २४.८
अपघाताची भीती            ११.८
वाहनांची गर्दी                  १०.२
बेशिस्त चालक                  ६.८ 
पदपथावर जागा नाही       ४.७
...............
पदपथांवर कोणत्या सुविधा असाव्यात?
सुविधा                           टक्केवारी
शौचालय                          ७२.६
कचरा पेटी                        ७२.१
बसण्यासाठी बेंच-शेड       ६७.६
स्वच्छता                         ६६.६
अडथळामुक्त                  ५६.२
पथदिवे                           ४७.२
रेलिंग                              ४३.४
दिशादर्शक चिन्हे            ४२.७
सुशोभीकरण                ३२.५.
...............