प्रतीक्षा वाढीव अनुदानाची
By Admin | Updated: March 23, 2017 04:35 IST2017-03-23T04:35:03+5:302017-03-23T04:35:03+5:30
मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी राज्यातील ७ साहित्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधीचा

प्रतीक्षा वाढीव अनुदानाची
पुणे : मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी राज्यातील ७ साहित्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र आठ महिने उलटले तरी यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. साहित्य संस्था या वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेत
आहेत.
यंदा राज्याच्या अंदाजपत्रकात मराठी भाषेसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी साहित्य संस्थांच्या वाढीव अनुदानासंदर्भातील कोणतेच पत्र मंडळाला मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव अनुदानाची रक्कम मिळणार का? हा निर्णय अद्याप तरी अंधातरीच आहे.
दरवर्षी वाङ्मयीन उपक्रमांसाठी शासनाकडून राज्यातील ७ संस्थांना ५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामध्ये मुंबई साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, कोकण साहित्य
परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि साहित्य महामंडळ यांचा समावेश आहे.
अनुदानवाढीसंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. त्याला आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी शासनाला यावर निर्णय घेण्यास अद्यापही सवड मिळालेली नाही. अंदाजपत्रकात यासंबंधी तरतूद झाल्याशिवाय वाढीव रक्कम देता येणे शक्य नसल्यामुळे शासनाच्या मंजुरीची वाट मंडळ पाहत आहे.
(प्रतिनिधी)