Waiter stolen customer's debit card information; Cyber cell exposes interstate gang | वेटरने चोरली ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती; सायबर सेलने केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

वेटरने चोरली ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती; सायबर सेलने केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

पिंपरी : हॉटेलमधील वेटरच्या मदतीने ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती चोरुन खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीचा सायबर शाखेने पर्दाफाश केला आहे. झारखंड आणि बिहारपर्यंत या टोळीचे लागेबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून डेबिडकार्डची माहिती चोरणारे तीन स्किमर जप्त केले आहेत.

डेबिट कार्ड क्लोन करुन खात्यातून पैसे काढल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दाखल झाल्या होत्या. त्याचा तपास करताना बिहार आणि झारखंड येथील एटीएम केंद्रातून पैसे काढल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तक्रारदारांकडे केलेली चौकशी आणि डेबिट कार्ड वापराचे विश्लेषण केल्यानंतर डेबिट कार्डची माहिती चोरल्याचे सायबर सेलने शोधून काढले.

उन्मेश अन्वेकर यांच्या डेबिटकार्डची माहिती आणि पिन क्रमांक चोरुन २ जानेवारी रोजी ५० हजार रुपये बिहार मधील पटना येथून काढण्यात आले. या प्रकरणी भोसरीतील एका बार रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या निखिल पाटील (वय २३, मूळ रा. देवास मध्यप्रदेश) याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याच्याकडून स्किमर आणि डेबिटकार्ड जप्त केले. आरोपी पाटील हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या डेबिट कार्डची माहिती चोरुन खालिद अन्सारी (वय २७, रा. धानोरी गावठाण, मूळ का. देवघर, झारखंड) याला देत होता. अन्सारी संबंधित डेबिटकार्डची माहिती बिहारमधील त्याच्या साथीदारांना पाठवायचा. त्या आधारे आरोपी बिहारमधून पैसे काढून घ्यायचे. अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून लॅपटॉप आणि एक डेबिटकार्ड स्किमर जप्त केले आहे.

आकाश खोकर यांनी ११ जानेवारी रोजी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या डेबिटकार्डची माहिती चोरुन १५ हजार ९०० रुपये चोरण्यात आले होते. या प्रकरणी वाकड रस्त्यावरील विशाल नगर येथील रेस्टॉरंट बारमधील सद्दाम हुसेन (वय २९), फुरकान अन्सारी (वय ३२, दोघे रा. पिंपळे निलख, मूळ रा. झारखंड) यांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ डेबिटकार्ड, १ लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह जप्त करण्यात आल्याची माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी दिली.

---------------
पाचशेहून अधिक जणांची माहिती चोरीस

डेबिट कार्डच्या दोन्ही गुन्ह्यांमधील चार आरोपींनी सुमारे पाचशेहून अधिक जणांच्या डेबिटकार्डची माहिती बिहार आणि झारखंड येथे पाठविली आहे. ही माहिती त्यांनी कशी पाठविली, त्यांचे साथीदार कोण आहेत, याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.
------------------

डेबिटकार्ड वापरताना काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

- हॉटेल, पेट्रोलपंप, मॉल, दुकान अथवा पी.ओ.एस यंत्रावर आपल्या समोरच डेबिट-क्रेडीट कार्ड स्वाईप करण्याची मागणी करा.

- एटीएम सेंटरमध्ये कार्ड वापरण्यापूर्वी त्याला स्किमर लावले नसल्याची खात्री करा.
- पी.ओ.एस अथवा एटीएम केंद्रात पिन नंबरची कळ दाबताना यंत्राचा की बोर्ड हाताने झाकून घ्या.

- कार्ड इतरांच्या ताब्यात देऊन पिन क्रमांक सांगू नका.
- हॉटेल मालकांनी देखील आपल्या वेटरवर लक्ष ठेवावे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Waiter stolen customer's debit card information; Cyber cell exposes interstate gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.