पुणे : जिल्ह्यात मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मृत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एकट्या बारामती तालुक्यातून आतापर्यंत सुमारे साडसहा हजार मृत मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. तलाठी व ग्रामसेवकांच्या मदतीने केंद्रस्तरीय मतदान अधिकारी ही नावे कमी करत आहेत. त्यामुळे मतदार यादीचे शुद्धीकरण होत असून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी या मोहिमेवर भर दिला जात असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्ध करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून अर्ज क्रमांक ७ भरून मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली जात आहेत. मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिल्यास बनावट मतदानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत वाद निर्माण झाले आहेत. तसेच मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत कायम राहिल्यास एकूण मतदार संख्या वाढलेली दिसते आणि प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे भासते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी अचूक दर्शवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी मृत मतदारांची नावे वेळेवर वगळणे आवश्यक असल्याचे कळसकर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सध्या ही मोहीम एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून, तलाठी आणि ग्रामसेवकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी यावर भर देण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कळसकर यांनी केले आहे. दुसरीकडे मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेंतर्गत घरभेटी, माहिती संकलन आणि नोंदी अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात सध्या ९१ लाख ५९ हजार ५१८ मतदार नोंदणीकृत असून, मतदार पुनर्निरीक्षणाचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत सुमारे २४.२६ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Web Summary : Pune district is removing deceased voters from rolls for accuracy. Baramati alone has purged 6,500 names. This drive ensures a clean voter list before a special revision program, improving transparency and accurate voter turnout.
Web Summary : पुणे जिले में सटीकता के लिए मतदाता सूची से मृतकों के नाम हटाए जा रहे हैं। अकेले बारामती से 6,500 नाम हटाए गए हैं। यह अभियान विशेष पुनरीक्षण कार्यक्रम से पहले मतदाता सूची को साफ करता है, जिससे पारदर्शिता और सटीक मतदाता मतदान सुनिश्चित होता है।