Pune: भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:08 PM2024-04-15T15:08:40+5:302024-04-15T15:10:55+5:30

भाटघर धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला तसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुरातन मंदिरे दिसू लागली आहेत....

Visibility of Pandava-era Nagoba temple as water in Bhatghar dam recedes | Pune: भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन

Pune: भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन

भोर (पुणे) : भाटघर धरणातील पाणी कमी झाल्यामुळे जुन्या वेळवंड (ता. भोर) गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर पाहण्यास मिळत आहे. भाटघर धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला तसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुरातन मंदिरे दिसू लागली आहेत. भाविक व ग्रामस्थ देवदर्शन घेण्यासाठी येत आहेत.

भोर तालुक्यात भोरपासून १८ किलोमीटरवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावे उठवून स्थलांतरित करण्यात आली आहेत. स्थलांतरित झाली तरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. परंतु, या गावाच्या वेशी, घरे, जुन्या वाड्यांच्या खुणा, मंदिरे आजही आपल्याला या धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यावर पाहावयास मिळतात.

भाटघर पाणलोट क्षेत्रात जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर दहा महिने पाण्यामध्ये असते. पाणी कमी झाल्यामुळे मंदिर पाहण्यास मिळत आहे. मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे. या परिसरात व धरण भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. मंदिराचा गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडी व वाळूमध्ये केलेले आहे.

वेळवंड गावातील ग्रामस्थ व तरुण मुले गाभाऱ्यातील गाळ काढून मंदिराची स्वच्छता करतात. पांडवकालीन पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. हा प्राचीन काळातील सांस्कृतिक वारसा जतन करण्याची काळाची गरज असल्याचे वेळवंड परिसरातील ग्रामस्थ सांगतात.

Web Title: Visibility of Pandava-era Nagoba temple as water in Bhatghar dam recedes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.