पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार होते. मात्र, पुणेपोलिसांनी शुक्रवारी पहाटे दोघांनाही अटक केली असून, अटकेपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मस्तपैकी मटणावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपी फरार असतानाही मोकाटपणे फिरत होते, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी तपास प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे का?,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कस्पटे म्हणाले, जर हे आरोपी फरार असतानाही मोकळेपणाने हॉटेलमध्ये राहत होते, गाड्यांतून फिरत होते, तर तपास प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे का?असे म्हणत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस त्यांना व्हीआयपी वागणूक देत आहेत. यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? हे सरकारने तपासावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना अटक केल्यानंतर सुरुवातीच्या २-३ दिवसांत त्यांना हॉटेलमधून जेवण दिलं जात होतं. गंभीर गुन्हा करूनही ते हसतमुखाने जेवत होते. हे बघणं वेदनादायक असल्याचे सांगत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारकडे केली होती.
तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह
या प्रकरणात पोलिसांनी आधीच पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे दोघे अखेर जेरबंद झाले. अटकपूर्वीचा या दोघांचा जेवणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी फरारी काळात आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.