भाजपकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसचा आरोप; काँग्रेस नेत्यांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट
By राजू हिंगे | Updated: March 19, 2024 19:35 IST2024-03-19T19:29:00+5:302024-03-19T19:35:14+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली....

भाजपकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसचा आरोप; काँग्रेस नेत्यांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट
पुणे : पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असल्याचा आराेप काँग्रेसचे नेते मोहन जोशी, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
भाजपकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत आहे. यातून ते सुरुवातीच्या दिवसांपासून निवडणूक हायजॅक करू पाहत आहेत. आचारसंहिता लागू असताना शहरातील गल्लीबोळातील भिंतीवर कमळाचे चित्र भाजप रंगवत आहे. आजही हे 'विद्रुपीकरण' सुरू आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवर घालून दोषींवर योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
भाजप पक्षाच्या चिन्हाचे जागोजागी रंगवलेले चित्र ७२ तास उलटल्यानंतरही कायम आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार पहायला मिळत आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणुका लढवण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे असे माेहन जाेशी यांनी सांगितले.
तर हाताचा पंजा भेट देऊ
शहरातील शासकीय जागेवर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे कमळाचे चिन्ह रंगवण्यात आले आहे. आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे. येत्या २४ तासात भिंतीवरील कमळ पुसले गेले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. भाजपवर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताचा पंजा भेट देऊ, अशी भूमिका आमदार रविंद्र धंगेकर यांनी यावेळी मांडली.