Pune Crime : हिंगणीगाड्यात ३ लाखांचा गावठी दारू साठा उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:01 IST2024-11-18T12:00:46+5:302024-11-18T12:01:51+5:30
हिंगणीगाडा (ता. दौंड, जि. पुणे ) येथे निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 2,96,000 रुपये किमतीचा ...

Pune Crime : हिंगणीगाड्यात ३ लाखांचा गावठी दारू साठा उद्ध्वस्त
हिंगणीगाडा (ता. दौंड, जि. पुणे) येथे निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 2,96,000 रुपये किमतीचा गावठी दारू साठा उद्ध्वस्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील आणि संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे यांच्या पथकाने आज (दि. 18/11/2024) यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे हिंगणीगाडा येथे छापा टाकून केली.
गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अवैध गावठी दारूचा साठा आढळून आला. आरोपी पारसमणी पोपी राठोड (वय 34) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सदर दारूचा पुरवठादार जेजुरी येथील संतोष राठोड फरार झाला आहे.
कारवाईदरम्यान, गावठी हातभट्टी दारूने भरलेले 35 लिटर क्षमतेचे एकूण 80 कॅन पंचांसमक्ष मोकळ्या जागेत ओतून नष्ट करण्यात आले. त्यानंतर रिकामे कॅनही उद्ध्वस्त करण्यात आले. एकूण 2,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.
गावठी दारू निर्मूलनाची धडक मोहीम
राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक काळातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे.