प्लॉटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखलेंना अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 17:11 IST2020-03-28T17:11:06+5:302020-03-28T17:11:24+5:30
गिरीवन नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे असे भासवले.

प्लॉटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखलेंना अटकपूर्व जामीन
पुणे : खोटे अमिष दाखवून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेते विक्रम गोखले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामीन देताना शिथीलता पाळण्याबाबत निर्देश आल्यानंतर सुजाता फार्म लि. या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी यांना 15 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. आगरकर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह आणखी दोघांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह इतर 14 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिला आहे. सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी आणि कंपनीचे अध्यक्ष गोखले यांनी गिरीवन नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे असे भासवले. आणि ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह इतर 13 व्यक्तींनी आपली एक कोटीची फसवणूक झाल्याचे फियार्दीत नमुद केले आहे.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अॅड. सुचित मुंदडा यांनी सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला. या प्रकरणात तात्काळ कोठडीची आवश्यकता नाही. कोरोनामुळे परिस्थिती विस्कळीत असल्याने दोघांना जामीन देण्याची मागणी अॅड. मुंदडा यांनी केली. न्यायालयने त्यांना 15 एप्रिलपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केल्याचे मुंदडा यांनी सांगितले.