पबजी गेमचा बळी : सोळा वर्षीय तरुणाने आत्महत्येचा व्हिडीओ शूट करून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:32 IST2019-12-03T16:31:18+5:302019-12-03T16:32:42+5:30
मागील वर्षी धुमाकूळ घालून अनेक तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पब-जी आणि ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या विळख्यातून अजूनही तरुणाई बाहेर येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहेत.

पबजी गेमचा बळी : सोळा वर्षीय तरुणाने आत्महत्येचा व्हिडीओ शूट करून संपवले जीवन
पुणे : मागील वर्षी धुमाकूळ घालून अनेक तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पब-जी आणि ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या विळख्यातून अजूनही तरुणाई बाहेर येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहेत. त्याच प्रकारातली धक्कादायक घटना पुण्यात समोर आली असून १६ वर्षीय मुलाने त्याच्या आत्महत्येचा व्हिडीओ शूट करून आपले आयुष्य संपवले आहे. रविवारी बिबवेवाडी भागात ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,या तरुणाचे वय १६ वर्ष होते. संबंधित तरुणीने दहावीची परीक्षा देण्याआधी शाळा सोडली होती. मोबाईल गेम आणि इंटरनेटच्या व्यसनामुळे त्याला अभ्यासाला वेळ मिळत नसे. घरी तो आजीसोबत राहत होता. तिनेही त्याला अनेकदा मोबाईलच्या अति वापराबद्दल रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने त्याची सवय बदलण्याची तयारी दाखवली नाही. स्वभावाने तो अतिशय शांत आणि आत्मविश्वास असलेला होता. नुकताच त्याने टिकटॉक व्हिडीओ आणि पबजी गेम खेळण्यासाठी नवा फोन घेतला होता. हा प्रकार मध्यरात्री तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर मृत तरुणाने शूट केलेला आत्महत्येचा व्हिडीओ बघून पोलिसही चक्रावून गेले आहेत.त्याने चित्रित केलेल्या व्हिडिओत टीव्ही सुरु असल्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. त्यावेळी त्याची आजी झोपली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर अधिक तपास करत आहेत.
दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले असून त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतून तरुणांचे मोबाईल गेमचे व्यसन पुन्हा एकदा त्यांच्या जीवावर उठत असल्याचे बघायला मिळाले आहे.