Pune: पुण्याच्या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका नाटकादरम्यान गोंधळ घातला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच वंचित बहुजन कार्यकर्त्यांनी राडा घातला. या नाटकातून गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाट्यगृहात धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग सुरु होता. संध्याकाली सहा वाजण्याच्या सुमारास हे नाटक सुरू झालं होत. खासदार मेधा कुलकर्णी या देखील या नाटकाच्या प्रयोगासाठी उपस्थित होत्या. अडीच तास हे नाटक सुरु होता. त्यानंतर रात्री ८.३० सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात प्रवेश करत गोंधळ घातला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. गौतम बुद्धांचा संदेश चुकीने दाखवला गेल्याचा दावा करत नाटकातल्या काही संवादांवर वंचितने आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा नाट्यगृह परिसरात तैनात करण्यात आला आहे.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातून तथागत गौतम बुद्धांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत सभागृहाबाहेर राडा घातला. या नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी असून, निर्माता सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि सहनिर्माता नाट्यसंपदा कला मंच आहे. या नाटकाचे सध्या सर्वत्र प्रयोग आयोजित केले जात आहेत.
"संन्यस्त खड्ग या नाटकात बुद्ध विचार, बौद्ध संस्कृती आणि भिक्खू भिक्खुनी संघ यांच्याविषयी तिरस्काराने आणि अतिशय अनैतिहासिक मांडणी केलेली आहे. त्याचा विरोध म्हणून हा आवाज आहे. तर्कहीन आणि निर्बुद्ध नाटकाला सेन्सर बोर्डाने परवानगी देणे हे त्याहून दुर्दैव आहे. ऐन वर्षावासाच्या काळात या दर्जाहीन नाटकाचे प्रयोग लावणे या मागची भूमिका देखील लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा महाराष्ट्रातील जेथे जेथे हे नाटक सादर करण्यात येईल तेथे संविधानिक मार्गाने विरोध केला जाईल," असं आंदोलकांनी म्हटलं.
विनायक दामोदर सावरकर लिखित "संगीत संन्यस्त खड्ग" (१९३१) हे नाटक ८ जुलै २०२५ पासून मुंबई, नाशिक, पुणे येथे प्रदर्शित केले आहे. सावरकरांनी या नाटकामध्ये तथागत बुद्धाचे चरित्रहनन केले आहे असून, बुद्ध धम्माची आणि संघाची बदनामी केली आहे, तरीही सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था आणि चित्पावन मंडळींकडून हे नाटक हेतूपूर्वक प्रदर्शित केले जात आहे, हे नाटक अत्यंत विकृत मानसिकतेतून लिहिले गेले आहे, असेही वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित नाट्य संपदा कला मंच यांच्या सहयोगाने रवींद्र माधव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर लिखित व दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत असलेल्या या संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचे प्रयोग पुन्हा राज्यभर केले जात आहेत. याप्रकरणी साठे आणि मंगेशकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत नाट्यगृह प्रशासन आणि आयोजकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ताे होऊ शकला नाही.