पुणे: लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत १० कोटी ५० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. याप्रकरणी अभिनय अमरनाथ यादव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना २४ जुलै २०२५ रोजी एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानुसार, इंडिगो विमान क्रमांक ६ ई-१०९६ ने बँकॉकहून पुण्यात आलेल्या अभिनय यादव याला विमानतळावर अडवून चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्या सामानात हायड्रोपोनिक वीड प्रकारचा अंमली पदार्थ आढळून आला. एकूण १०.४७ किलो वजनाच्या या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत साडेदहा कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कस्टम विभाग आणि संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यादवकडून या अंमली पदार्थ कुठून आणला तो कोठे वितरित करणार होता? त्यामागचे नेटवर्क याचा कस्टम विभागाकडून तपास करण्यात येत आहे.
अत्यंत महागडा
हायड्रोपोनिक गांजा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित वातावरणात पाण्यात वाढवण्यात येणारा उच्च प्रतीचा गांजा प्रकार मानला जातो. त्याचा वापर प्रामुख्याने व्यसनासाठी होतो आणि तो अत्यंत महागडा असतो.