हडपसर मतदारसंघातील मतांची पडताळणी रद्द, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:39 IST2025-07-24T12:39:12+5:302025-07-24T12:39:21+5:30
- प्रशांत जगताप यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे निर्णय

हडपसर मतदारसंघातील मतांची पडताळणी रद्द, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हडपसर व खडकवासला विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीची २९ यंत्रांमधील मतांची पडताळणी करण्यात येणार होती. मात्र, हडपसर मतदारसंघातील मतांची पडताळणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत याचिकाकर्ते उमेदवार प्रशांत जगताप यांनी उच्च न्यायालयात पुन्हा मतदान याचिका दाखल केल्याने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही पडताळणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतरच ही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. तर ठरलेल्या वेळापत्रकानुसार, २५ जुलै रोजी केवळ खडकवासला मतदारसंघातील दोन यंत्रांमधील मतांचीच पडताळणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जगताप यांची म्हणणे मान्य करत केंद्रीय निवडणूक आयोगाला मतांच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत हडपसर मतदारसंघातील जगताप यांनी निवडलेल्या २७ यंत्रांमधील मतांची पडताळणी होणार होती. जगताप यांनी मतमोजणी पुन्हा होईल, असा व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण देत केवळ कंट्रोल युनिटमधील मतांची अंतिम आकडेवारी संबंधित उमेदवाराला दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने १ हजार ४०० मते टाकून व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली होती.
जगताप यांनी पुन्हा उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे जिल्हा निवडणूक शाखेला कळवले होते. त्यानंतर याबाबत सविस्तर निर्देश मिळावेत, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर चोकलिंगम यांनी ही पडताळणी रद्द करण्याचे निर्देश यंत्रांची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या भारत इलेक्ट्रिकल कंपनीला दिले आहेत. त्यामुळे जगताप यांच्यासाठीची पडताळणी आता रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता केवळ खडकवासला मतदारसंघातील दोन यंत्रांमधील मतांचीच पडताळणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.