Vasota Fort Trek : वासोट्याचे पर्यटन तीन दिवस बंद राहणार
By श्रीकिशन काळे | Updated: December 26, 2024 15:42 IST2024-12-26T15:40:46+5:302024-12-26T15:42:51+5:30
सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाचा निर्णय

Vasota Fort Trek : वासोट्याचे पर्यटन तीन दिवस बंद राहणार
पुणे : निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली. पुण्यातून या ठिकाणी पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते.
पुणे जिल्ह्याच्या अगदी जवळ असलेल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना देण्यात आल्या आहेत. या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरात कोणीही बेकायदेशीरीत्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी बाठे यांनी दिला आहे.