Punr Swargate News: 'सुरक्षा कार्यालयाच्या बाजूलाच गाडी उभी होती. इथे २० सुरक्षा कर्मचारी आहेत. जर २०-२० सुरक्षा कर्मचारी असून, जर बलात्कार होत असतील, तर सुरक्षा कार्यालय कशाला हवे?', असा सवाल करत शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. एका २६ वर्षीय तरुणीला साताऱ्याच्या गाडीत बसवून देतो म्हणून आरोपीने बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले आहेत.
वसंत मोरेंनी सुरक्षा कार्यालय फोडले
शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात असलेल्या सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले, "आतल्या बाजूस पोलीस येऊ शकत नाहीत. मग इथे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी केबिन दिले आहेत का? आतल्या बाजूला मी जाऊन आलोय. तिकडे चार शिवशाही बसेस उभ्या आहेत. चार बसेसचं या लोकांनी लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की, याच नालायक लोकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थित इथे दररोज बलात्कार होताहेत", असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला.
"जो प्रकार इथे घडलाय, तो इथे रोज होतोय"
"त्या एसटीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम पडलेले आहेत. याचा अर्थ काय, इथे जो प्रकार घडला आहे, तो इथे रोज होतोय. यामध्ये या कर्मचाऱ्यांचा हात आहे. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? ही लोक इथे केबिन उबवायला आहेत का?", असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी केला.
ज्या वेळी बलात्काराची घटना घडली, त्यावेळी ती शिवशाही बस सुरक्षा कार्यालयाच्या समोर होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय, आगाराची सुरक्षा करणे. सुरक्षा कार्यालयाच्या बाहेर जर एखाद्या आयाबहिणीवर बलात्कार होत असेल, तर यांना सुरक्षा कार्यालयाची आणि तिथे बसण्याचा अधिकार नाही", असे वसंत मोरे म्हणाले.