वरुणराजाच्या रजेचा पुणेकरांना चटका! पुढील दोन आठवडे कसे असेल वातावरण?
By श्रीकिशन काळे | Updated: August 12, 2023 15:03 IST2023-08-12T15:02:45+5:302023-08-12T15:03:54+5:30
पावसाळ्यात पुणेकरांना उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागत आहे...

वरुणराजाच्या रजेचा पुणेकरांना चटका! पुढील दोन आठवडे कसे असेल वातावरण?
पुणे : पावसाळ्यात पुणेकरांना उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागत आहे. पाऊस नसल्याने आणि तापमानाचा पारा वाढल्याने दिवसा लख्ख उन्ह पडत आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत असून, उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पावसाने भर पावसाळ्यात रजा घेतल्याने पुणेकरांना उन्हाच्या चटक्याची सजा मिळत आहे. येत्या एक दोन आठवडे असेच वातावरण राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
शहरात व राज्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. एक तर यंदा मॉन्सून उशीरा आला आणि येऊनही म्हणावा तसा बरसला नाही. त्यामुळे पावसाची सरासरी अजून तरी झालेली नाही. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जोरदार असा पाऊस झाला नाही. शहरात अनेक भागात पाऊस पडायचा आणि दुसऱ्या भागात लख्ख उन्ह असायचे. आताही तशीच परिस्थिती जाणवत आहे. स्थानिक पातळीवरील हवामान बदलाचे हे परिणाम आहेत. एक आठवड्यापासून पावसाने रजा घेतली असून, पुढील आठवड्यातही तो सुटीवरच असणार आहे. त्यामुळे सध्या सूर्यनारायण चांगलाच तापू लागला आहे. शहरातील तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. हे तापमान ३२ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. पावसाळ्यात एवढे तापमान कदाचित प्रथमच पुणेकर अनुभवतील.
रात्रीही उकाडा वाढला
शहरातील रात्री आणि सायंकाळचे तापमान देखील २१ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यात सतत पावसाने धिंगाणा घातला होता आणि आता पावसाळ्यात मात्र विश्रांती घेत आहे, यावरून पुणेकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.
शहरातील तापमान
५ ऑगस्ट : २८.१
६ ऑगस्ट : २७.६
७ ऑगस्ट : २८.३
८ ऑगस्ट : २९.२
९ ऑगस्ट : ३०.३
१० ऑगस्ट : २९
११ ऑगस्ट : २९१२ ऑगस्ट : ३०
शहरातील पाऊस
शहरात ११ ऑगस्टपर्यंत ५६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जो सरासरी ६१४.८ मिमीपर्यंत होत असतो. यंदा बराच कमी पाऊस झाला आहे. अजून हा आठवडा कोरडा जाण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत आहे. उन्ह पडल्याने जमिनीमधील ओलावाही कमी होतो. त्यामुळे जमीन तापते. काही दिवस पुण्यात पावसाची विश्रांती राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
- अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग