Pune: वरंधा घाटातील एस. टी. बस वाहतूक बंद; भोर - महाड रस्ता दुरुस्तीसाठी २ महिने बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:08 PM2024-04-02T14:08:09+5:302024-04-02T14:09:21+5:30

भोर, पुणे डेपो व इतर डेपोंच्या दररोजच्या ११ फेऱ्या बंद होणार आहेत....

Varandha Ghat Stop st bus traffic; Bhor - Mahad road closed for 2 months for repairs | Pune: वरंधा घाटातील एस. टी. बस वाहतूक बंद; भोर - महाड रस्ता दुरुस्तीसाठी २ महिने बंद

Pune: वरंधा घाटातील एस. टी. बस वाहतूक बंद; भोर - महाड रस्ता दुरुस्तीसाठी २ महिने बंद

भोर : वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी भोर - महाड रस्ता दोन महिने बंद राहणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे भोर, पुणे डेपो व इतर डेपोंच्या दररोजच्या ११ फेऱ्या बंद होणार आहेत.

भोर तालुक्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंध (ता. महाड, जि. रायगड) ते रायगड जिल्हा हद्द हा वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी १ एप्रिल ते ३० मे असा दोन महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा वरंध घाट पुढील दोन महिने बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाने भोर-महाड रस्त्याने कोकणात जाणाऱ्या भोर डेपोची भोर-महाड बस, पुणे डेपोची पिंपरी-चिंचवड ते खेड, पिंपरी चिंचवड ते अहिरेवाडी, पिंपरी चिंचवड ते माखजन, पिंपरी चिंचवड ते दापोली, पुणे ते महाड, जळगाव ते महाड, आंबेजोगाई ते खेड, पोलादपूर ते पुणे, महाड ते पुणे या सर्व ११ गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होणार आहेत.

दरम्यान, या एस.टी. बस बंद केल्यामुळे कोकणात जाणारे पर्यटक चाकरमानी, माल वाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी अडचण होणार आहे. सध्या पाडवा, लग्न समारंभ सिझन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. मात्र, एस.टी. बस सेवा बंद झाल्याने प्रवासी नागरिकांचे मोठे हाल होणार असून यावर पर्याय काढण्याची मागणी होत आहे.

राजेवाडी (ता. महाड) ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये (भोर हद्दीपर्यंत) संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. परंतु पारमाची वाडी ते रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे आहे. परंतु या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे १ एप्रिल ते ३० मे पर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी अशी विनंती पत्रान्वये केलेली आहे.

Web Title: Varandha Ghat Stop st bus traffic; Bhor - Mahad road closed for 2 months for repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.