Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:41 IST2025-12-01T06:40:19+5:302025-12-01T06:41:12+5:30
मध्य रेल्वे विभागात पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी विभागांत वाढत्या वंदे भारत गाड्या धावत आहेत.

Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
पुणे : देशात 'वंदे भारत'ची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व रेल्वे विभागात नव्याने 'वंदे भारत' गाड्या सुरू करण्यात येत आहेत. परिणामी, वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे विभागात वंदे भारत एक्स्प्रेस कोचिंग डेपो वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
कोचिंग डेपो उभारण्यासाठी रेल्वे बोर्डाने पावणेपाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भविष्यात वंदे भारत रेल्वे गाड्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर आणि जलद होण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वे विभागात पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी विभागांत वाढत्या वंदे भारत गाड्या धावत आहेत. वाढत्या वंदे भारतची संख्या पाहता सध्या उपलब्ध असलेल्या कोचिंग डेपोवर ताण पडू लागला आहे. येत्या काही महिन्यांत आणखी काही वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी डेपोची गरज
वंदे भारत एक्स्प्रेसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कोचिंग डेपोची आवश्यकता आहे. पुण्यातील घोरपडी कोचिंग आणि मेन्टनन्स डेपोचे वंदे भारत कोचिंग डेपोमध्ये रूपांतर केले जाणार आहे, तसेच वाडीबंदर आणि अजनी कोचिंग डेपोचेदेखील वंदे भारत एक्स्प्रेस कोचिंग डेपोमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
वंदे भारत, अमृत भारत अन् एलएचबी कोचसाठी स्वतंत्र लाइन
घोरपडी वंदे भारत कोचिंग डेपोसाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ठिकाणी सध्या रेल्वेचा कोचिंग व मेन्टेनन्स डेपो आहे. या डेपोचे रूपांतर वंदे भारत कोचिंग डेपोमध्ये केले जाणार आहे. त्यात देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र एक वेगळी लाइन, अमृत भारत एक्स्प्रेससाठी एक लाइन टाकली जाईल.