वाल्मीक कराडचे १०० अकाउंट, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक- सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:00 IST2025-01-06T08:59:58+5:302025-01-06T09:00:59+5:30

मारेकऱ्यांना फाशी द्या, पुण्यातील आक्रोश मोर्चात मागणी

Valmik Karad has 100 bank accounts meeting held at Dhananjay Munde bungalow for extortion said Suresh Dhas | वाल्मीक कराडचे १०० अकाउंट, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक- सुरेश धस

वाल्मीक कराडचे १०० अकाउंट, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक- सुरेश धस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बीडमध्ये वाल्मीक कराड हा संघटित टोळी तयार करून गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख व  सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मोर्चात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आदी सहभागी झाले होते. 

कराड याचे १०० अकाऊंट सापडले आहेत. एरवी ५० पेक्षा जास्त अकाऊंट असतील तर लगेचच ईडी चौकशी लागते, वाल्मीक विरोधात मात्र कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक काळात ५० लाख घेतल्याचा दावा

धस म्हणाले, १४ जून २०२४ रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वालूबाबा (वाल्मीक कराड), नितीन बिक्कड यांची धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर १९ जून २०२४ रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. 

या बैठकीत नितीन बिक्कड, वाल्मीक कराड, अनंत काळकुटे, अल्ताफ तांबोळी, अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून ५० लाख रुपये घेतले, असा आरोपही धस यांनी यावेळी केला.

गरज पडली, तर पुन्हा बोलवू; वायबसे दाम्पत्याला सोडले

  • मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुदर्शन सांगळे यांना अटक करण्यात वायबसे दाम्पत्याची पोलिसांना मदत झाली. आता त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे; परंतु गरज पडली, तर पुन्हा बोलवू, या अटीवर हे दाम्पत्य सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • डॉ. संभाजी वायबसे धारूर तालुक्यातील कासारी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखा या वकील आहेत. डॉ. वायबसे हे ऊसतोड मुकादमही आहेत. त्यांनी अनेकदा मजुरांचे अपहरण करण्यासाठी सुदर्शन घुलेची मदत घेतली होती. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झालेले आहेत.


मोक्काच्या हालचाली : वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राजकारण नको, चाैकशी होऊ द्या- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर: बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या हा गंभीर प्रकारच आहे. मात्र, या घटनेवरून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. या प्रकरणातून राजकारणाऐवजी समाजात सुधार व्हावा या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कुठल्याही मुद्द्यावरून सार्वजनिक ठिकाणी मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे आरोपी कुठेही गेले असतील व कुणीही मदत केली असेल तर कारवाई होत आहे. या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही व काही जण चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्यावी. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: Valmik Karad has 100 bank accounts meeting held at Dhananjay Munde bungalow for extortion said Suresh Dhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.