वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:24 IST2025-01-01T06:23:17+5:302025-01-01T06:24:27+5:30
सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले.

वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी
पुणे/केज : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड हा मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. दोन दिवसांपासून तो शरण येण्याच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन तो सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले.
कराड याने शरण येण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. तो येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने सकाळपासूनच मुख्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त होता. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे व परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. दुपारी बारा वाजता त्याची खासगी कार सीआयडी मुख्यालयाच्या दुसऱ्या गेटमधून आत आली.
कराडसोबत होते दोघेजण -
वाल्मीक कराड चेहरा लपवून आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यासमवेत एक परळीचा नगरसेवक व दुसरा निकटवर्तीय होता. पत्रकारांनी दोघांना विचारले की, तुम्ही त्याच्याबरोबर कसे?, तो तुम्हाला कुठे भेटला? निकटवर्तीय म्हणाला, वाल्मीक आम्हाला अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात भेटला. तिथून आम्ही इकडे आलो. परळीच्या नगरसेवकाने आपण परवापासून कराडसमवेत असल्याचा दावा केला. या वेळी बीड पोलिस देखील हजर होते.
केज पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड स्वतःहून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे येथील मुख्यालयात हजर झाला. या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या बीड विभागाचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत आहेत. सीआयडीचे पथक कराडला घेऊन बीडला रवाना झाले आहे.
- सारंग आव्हाड, उपमहानिरीक्षक,
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे