Valentine Day 2026: सुख, दुःख अन् माया; सर्व व्हिडीओ कॉलवरच, ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये नातं टिकवणं खूप आव्हानात्मक
By नम्रता फडणीस | Updated: February 14, 2026 11:32 IST2026-02-14T11:32:14+5:302026-02-14T11:32:44+5:30
Valentine Day 2026 गेल्या काही वर्षांपासून शिक्षण, नोकरी, परदेशातील संधी आणि करिअरच्या धावपळीमुळे तरुण-तरुणींना अनेकदा वेगवेगळ्या शहरांत किंवा देशांत राहावे लागत आहे.

Valentine Day 2026: सुख, दुःख अन् माया; सर्व व्हिडीओ कॉलवरच, ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये नातं टिकवणं खूप आव्हानात्मक
पुणे : मला दुखले, खुपले की तो जवळ नसतो... डोळ्यातून पाणी येते. कुणीतरी मायेने जवळ घ्यावे, असे खूप वाटते. पण, व्हिडीओ कॉलवरच समाधान मानावे लागते. खरेच खूप आव्हानात्मक असते, जवळचा प्रिय व्यक्ती लांब असताना नाते टिकवणे ! रोजचा व्हिडीओ कॉलच्या चौकटीतला संवाद जेव्हा प्रत्यक्ष होतो ना, तेव्हा तो फार अमूल्य वाटायला लागतो... अशा सुंदर शब्दांत चार वर्षांपासून ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये असलेली देवयानी जोशी व्यक्त झाली.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण, नोकरी, परदेशातील संधी आणि करिअरच्या धावपळीमुळे तरुण-तरुणींना अनेकदा वेगवेगळ्या शहरांत किंवा देशांत राहावे लागते. त्यामुळे ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ ही संकल्पना नव्या पिढीत वेगाने वाढताना दिसत आहे. स्मार्टफोन, व्हिडीओ कॉल, सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजचा संवाद साधला जातो. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, झूम यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे हजारो किलोमीटर अंतरावर असलेले जोडपेही एकमेकांच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग राहतात. या ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप' बद्दल सांगताना देवयानी खूपच हळवी झाली.
ती म्हणाली, जेव्हा तुमच्या नात्याला २ ते ३ वर्षे झालेली असतात, त्यावेळी नाते बहरत जाते, हळूहळू प्रेमाचे एकेक टप्पे पार करत या प्रेमाच्या प्रवासात तुम्ही पुढे जात असता. या प्रवासात एकमेकांच्या स्वभावाचे नवे पैलू उलगडत जातात. शारीरिक आकर्षण, शरीराची ओढ, सतत एकमेकांशी बोलत राहणे कमी होऊन नाते गूढ होत जाते. आपण एका शहरात असलो की, कधीही भेटता येते, काहीही अडचण आली, तरी आधी 'त्या' व्यक्तीशी संपर्क साधला जातो, कारण तीच एक व्यक्ती तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर असते. पण, लांब असताना इच्छा असूनही आपण वेळेला हजर राहू शकत नाही. साधे कुठे-कुठे खरचटले तरी फक्त व्हिडीओ कॉलवर मोबाइलच्या चौकोनातून लटकेच रडून ते 'त्याला' दाखवायचे असते. हे खूप अवघड असल्याची कबुलीही तिने दिली.
आमचे लग्न झाले असूनही तो कायम इंटरनॅशनल टूरवर असतो. त्यामुळे आमचे नाते, हसणे-बोलणे, सुख-दुःख शेअर करणे हे कायम व्हिडीओ कॉल किंवा व्हाॅट्सॲप मेसेजवरच होते. तरीही स्क्रीनवर तो दिसणे आणि जवळ असणे यात फरक असतोच. तो जवळ नसला की, चार ठायी स्वयंपाक रांधायला, पण उमेद नसते. घरी आल्यावर एकटा प्यायलेला चहापण कडू लागतो. आपला माणूस आपल्याबरोबर असताना जगलेला एक क्षण म्हणजेच प्रेमाचा दिवस. - जुई निमकर, गृहिणी
लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आठवण येणे, भेटणे, दिसणे, स्पर्श या गोष्टी हळूहळू बदलत जातात. नात्याच्या सुरुवातीला आठवण येणे स्वाभाविक असते. पण, दोघांपैकी एक इमोशनल आणि एक प्रॅक्टिकल असले की, नाते चांगले राहते. लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांच्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप हे व्हाॅट्सॲप मेसेजेस, कॉल आणि व्हिडीओ कॉलवर अवलंबून असते. त्यामुळे एकमेकांना क्वालिटी वेळ देणे गरजेचे आहे.- सिमरन वेल्हाळ, नोकरदार तरुणी