वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:35 IST2025-06-01T06:34:58+5:302025-06-01T06:35:34+5:30
रुखवतासाठी १ लाखाचा चेक अन् ५० हजार घेतले

वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. तेथून तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त करण्यात आले.
नीलेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेशच्या घरात मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. घरातून नीलेशचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूलही जप्त केले.
रुखवतासाठी १ लाखाचा चेक अन् ५० हजार घेतले
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेण्यात आले, असा दावा त्यांनी समाजमाध्यमावर केला. पोस्टसोबतच दमानिया यांनी बँक स्टेटमेंटचा फोटोही पोस्ट केला आहे. दरम्यान, वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुपेकर यांची शुक्रवारी मुंबईत होम गार्डच्या उपमहासमावेशकपदी बदली करण्यात आली आहे.
काय म्हणाल्या दमानिया?
दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, ''हा घ्या एक मोठा पुरावा...वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या महेच्यांकडून वसूल केले.’’
नीलेश चव्हाणकडून यापूर्वी तीन मोबाइल जप्त केले. शनिवारी आणखी त्याच्या घरातून तीन फोन जप्त केले. जप्त मोबाइल फाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. -अनिल विभुते, व. पो. निरीक्षक, बावधन