वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:08 IST2025-07-16T10:05:56+5:302025-07-16T10:08:07+5:30
लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी
पुणे : हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात नीलेश चव्हाण याने केलेल्या जामीन अर्जावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे.
वैष्णवी यांच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून त्यांच्या नातेवाइकांना नीलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) याने पिस्तूल दाखवून धमकाविले होते. या गुन्ह्यात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात सोमवारी (ता. १४) पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात हगवणे कुटुंबीयांसह एकूण सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यापैकी लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने त्यास पुढील तारीख दिली असून त्यावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे. तर लता व करिष्माच्या जामीन अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चिती करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी दिली.