वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 06:24 IST2025-05-29T06:24:00+5:302025-05-29T06:24:21+5:30
आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद

वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही
पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी संताप व्यक्त होत असताना आरोपीच्या वकिलाने मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला.
वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते.
पोलिस कोठडीत वाढ
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलिस कोठडी ३१ मेपर्यंत वाढविली.
चारित्र्यावर संशय
आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेन्डन्सी सुसाइड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
यांना मिळाला जामीन...
फरार दीर, सासरा यांना आश्रय दिला म्हणून अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५) आणि राहुल दशरथ जाधव (४५, दोघेही रा. पुसेगाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे.