वैशाली मोतेवारांना अटक; ‘समृद्ध जीवन’ घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:13 IST2018-06-30T23:38:13+5:302018-07-01T05:13:37+5:30
ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय ४३) यांना राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने अखेर शनिवारी अटक केली.

वैशाली मोतेवारांना अटक; ‘समृद्ध जीवन’ घोटाळा
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय ४३) यांना राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने अखेर शनिवारी अटक केली.
न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. वैशाली या निगडी येथे नातेवाइकांकडे राहत असल्याची माहिती सीआयडीच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, उपअधीक्षक टी. वाय मुजावर, पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या पथकाने त्यांना अटक केली. समृद्ध जीवन कंपनीने गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरातील ठेवीदारांची साडेतीन हजार कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी २०१४ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
समृद्ध जीवन कंपनीविरूद्ध आठ राज्यात फसवणुकीचे २७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात महेश मोतेवार याच्यासह संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. वैशाली या कंपनीच्या संचालक होत्या. दरम्यान, मोतेवारची दुसरी पत्नी लीना यांना एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर महेश मोतेवार यांचा मुलगा देखील या प्रकरणी कोठडीत आहे.वैशाली यांना रविवारी (१ जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.