उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:48 IST2025-08-07T15:47:13+5:302025-08-07T15:48:12+5:30
हे सर्व पर्यटक श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी उत्तराखंडला प्रयाण केले होते.

उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
मंचर/अवसरी (पुणे) : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील २४ पर्यटक अडकले होते. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, बुधवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप असल्याचे समजताच नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी उत्तराखंडला प्रयाण केले होते. बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी ते उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. ढगफुटीमुळे परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला आणि दूरसंचार यंत्रणा कोलमडल्याने त्यांच्याशी संपर्क तुटला होता. यामुळे काही काळ त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनिश्चितता होती.
मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर सर्व २४ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळाली. तसेच, राज्याचे माजी सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी थेट संपर्क साधून मदतीची विनंती केली. उत्तराखंड प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्याशी सतत समन्वय ठेवून पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्री परिसरातील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत. ढगफुटीमुळे वीज आणि संपर्क सुविधा खंडित झाल्याने काही काळ संभाषण अशक्य झाले होते, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे पर्यटक लवकरच महाराष्ट्रात सुखरूप परत येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अडकलेल्या पर्यटकांची नावे :
मंगल गडगे, अशोक किसन भोर, लीला रोकडे, माणिक ढोरे, मारुती शिंदे, समृद्ध जंगम, सतीश मांगडे, लीला जंगम, पुरुषोत्तम, संगीता वाळुंज, गहिणीनाथ शिंदे, अरुण सातकर, विठ्ठल खेडकर, सुनिता ढोरे, नितीन जाधव, बापू ठेंबेकर, सविता काळे, अशोक टेमकर, मंगल भेगडे, तुकाराम गावडे, मंदा वायाळ, उज्ज्वला पिंगळे, मंदा घाडगे, जनाबाई पवळे.
दरम्यान, नातेवाईक आणि गावकरी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.