अमेरिकन टेरिफमुळे टपाल विभागाला आर्थिक धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:56 IST2025-10-30T15:55:12+5:302025-10-30T15:56:19+5:30
- , ७२ लाख ९२ हजार ५१९ रुपयांचे उत्पन्न

अमेरिकन टेरिफमुळे टपाल विभागाला आर्थिक धक्का
पिंपरी : चिंचवड टपाल विभागाने (पूर्व) दिवाळीनिमित्त महिनभरात तब्बल १७ देशांमध्ये पाठविलेल्या दिवाळी फराळासह विविध भेटवस्तू व अन्य घरगुती साहित्याच्या माध्यमातून ७२ लाख ९२ हजार ५१९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या उत्पन्नात दहा टक्क्यांची वाढ झाली. मात्र, अमेरिकन टेरिफचा टपाल विभागाला मोठा फटका बसला आहे. अन्यथा उत्पन्नात एक कोटी रुपयाहून अधिक रकमेची भर पडली असती, असे टपाल विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा दिवाळीनिमित्त २२ सप्टेंबरपासूनच परदेशात भेटवस्तू, फराळासह अन्य साहित्य पाठविण्यासाठी बुकींग सुरू झाले. २६ ऑक्टोबरपर्यंत १९६६ ग्राहकांनी बाॅक्समधून हे साहित्य परदेशात पाठविले. या स्पीड पोस्ट पार्सल सेवेच्या माध्यमातून टपाल पूर्व विभागाने गेल्यावर्षी ६० लाख रुपये उत्पन्न मिळविले होते. तर, या वर्षी ते ६२ लाखांवर गेले.
यात अमेरिकेच्या टेरिफचा मोठा फटका बसला. कारण, गेल्या वर्षी पुणे विभागातून एकट्या अमेरिकेत पाठविलेल्या दिवाळी पार्सलमधून तब्बल ५५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्यात यंदा मोठी घट झाली. यंदा अमेरिकेच्या टेरिफ संकटामुळे टपाल खात्याने अमेरिकेत दिवाळी फराळ आणि भेटवस्तू पाठविण्यास स्थगिती दिली होती. मात्र, नंतर टेरिफमधील सूट ग्राहकांना समजावून सांगितली. त्यानुसार काही ग्राहकांनी अमेरिकेत पाठविलेल्या दिवाळी साहित्यापोटी ४ लाख ४२ हजारांचा महसूल मिळाला. तो गेल्या वर्षी पुणे विभागातून ५५ लाख रुपये इतका मिळाला होता.
स्पीड पोस्टाद्वारे या देशात पाठविला फराळ
टपाल पूर्व विभागाकडून जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, रशिया, कॅनडा, आर्यलंड, न्यूझीलंड, फ्रांस, नाॅर्वे, सिंगापूर, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती, स्वीडन, जाॅर्जिया, दक्षिण कोरियासह अन्य देशांमध्ये यंदा दिवाळी फराळ आणि भेटवस्तू रवाना करण्यात आल्या. शेवटच्या टप्प्यात अमेरिकेतही काही प्रमाणात फराळ पाठविण्यात आला.
यावर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने परदेशात पार्सल पाठवण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेमध्ये सध्या सुरू असलेल्या टेरिफ स्थितीमुळे पार्सल पाठविण्यामध्ये काही अडचणी आल्या. मात्र तेथील टेरिफच्या निर्देशाचे अनुपालन करून अमेरिकेत देखील पार्सल पाठविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले.- नितिन बने, जनसंपर्क अधिकारी, चिंचवड टपाल विभाग