नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:14 IST2025-12-18T10:13:53+5:302025-12-18T10:14:30+5:30
एलिव्हेटेड ब्रिजच्या मंजुरीसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत

नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी
धायरी : नवले पूल व परिसरातील जीवघेण्या अपघातांच्या मालिकेवर उपाय म्हणून येथे एलिव्हेटेड ब्रिज उभारण्यास मंजुरी देण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही निर्णायक माहिती दिली. पुणे - बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, नऱ्हेतील रहिवासी भूपेंद्र मोरे हे उपस्थित होते.
नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात महिला व मुलीचा अतिशय विदारक मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. नागरिकांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये एलिव्हेटेड ब्रिजची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला तातडीची मंजुरी दिली. अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश...
एलिव्हेटेड ब्रिजच्या मंजुरीसोबतच गडकरी यांनी सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. संबंधित विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांनी लवकर कार्यवाही करावी, असे निर्वाणीचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सर्व प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून एलिव्हेटेड ब्रिजच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.