कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा, आता आयुष्यात सोबती हवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:37 IST2025-04-23T11:36:33+5:302025-04-23T11:37:28+5:30
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची युगेंद्र पवार यांना मिश्कील साद

कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा, आता आयुष्यात सोबती हवी
बारामती : अजित आणि माझ्याशी युगेंद्रची तुलना करू नका. आमच्यासोबत सत्ता होती, सत्तेमुळे अनेक कामे होतात. आत्ता युगेंद्रकडे सत्ता नाहीये. तो सत्ता नसताना गोरगरिबांसाठी संघर्ष करतोय. तो गोष्टी समजून उमजून घेतो. त्याचा स्वभाव सुसंवाद ठेवण्याचा आहे, अशा शब्दात नातवाचं कौतुक करत कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा आणि एकट्याचे अभिनंदन करायचे? आता आयुष्यात सोबती हवी, अशा मिश्कील शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयुष्याचा साथीदार आणण्याचा सल्ला दिला.
ज्येष्ठ नेते पवार सोमवारी (दि. २२) बारामती दाैऱ्यावर आहेत. आजच युगेंद्र श्रीनिवास पवार यांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. पवार म्हणाले, ‘युगेंद्र यांचा वाढदिवस आहे. माझ्या उपस्थितीत केक कापावा, असे तुम्हाला वाटले. मला आनंद आहे की, जमाना बदलतोय. लहान गावी केक यायला लागले आहेत. माझ्या लहानपणी वाढदिवस असला की, गुळ-शेंगदाणे किंवा गुळ-खोबरे दिले जायचे. एकट्याचे अभिनंदन आणि वाढदिवस किती दिवस साजरे करायचे? आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, आता फार लांबवू नका. दिवस निघून चाललेत. व्यक्तिगत जीवनात शेवटी आधार महत्त्वाचा असतो. तो घरातल्यापेक्षा कुठे मिळत नसतो. याचा विचार गांभीर्याने करा. आपण माझे बोलणे मनावर घ्याल, या अपेक्षा असल्याचा चिमटा घेत युगेंद्र यांनी नातसून आणावी’, असा सल्ला मिश्कीलपणे दिला. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
...हा ठाकरे कुटुंबियांचा काैटुंबिक प्रश्न
दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हा ठाकरे कुटुंबियांचा काैटुंबिक प्रश्न आहे. त्याची माहिती मला नाही, मी काही त्यांच्याशी बोललो नाही. त्यावर मी कसं भाष्य करू, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. एआय तंत्रज्ञान शेती उपयोगी आहे. आमचा रस शेतीत आहे. हे तंत्रज्ञान अनेक गोष्टींनी उपयोगी आहे. जमिनीचा पोत राखणे, खताची गरज ओळखणे हे यामुळे शक्य आहे. राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्र्यांनी आणखीन पाच पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर जाहीर केला याचा आनंद आहे. शेतकऱ्यांनी याचा आपल्या शेतीत फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.