पुणे: नांदेड येथून कामासाठी पहाटे पुण्यात उतरलेल्या तरुणाकडे तिघांनी धमकावून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्या कारणातून तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी तीन चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. याबाबत संतोष अमित जाधव (२२, रा. गंगानगर, ता. किनवट, जि. नांदेड) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर असलेल्या रेल्वे पार्सल विभागाचे पुढे असलेल्या व्हीआयपी साईडिंगच्या ठिकाणी ९ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष जाधव हा कामानिमित्त पुण्यात आला होता. पहाटे रेल्वेने उतरल्यानंतर तो बाहेर जात असताना तिघांनी त्यांना वाटेत अडवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार देताच तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. एकाने त्याच्याजवळील चाकूने जाधव याच्या पोटात वार करून गंभीर जखमी केले. संतोष जाधव याच्यावर ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक खेडकर पुढील तपास करत आहेत.