Pimpri Chinchwad: अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:08 IST2024-02-27T13:08:04+5:302024-02-27T13:08:44+5:30
घराजवळ खेळत असताना त्याचे अपहरण केले. त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले...

Pimpri Chinchwad: अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार
पिंपरी : वाकड येथील अपहरण करून खून झालेल्या आठवर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. उसाचा रस पाजून मुलाला आमिष दाखवले. त्यानंतर घराजवळ खेळत असताना त्याचे अपहरण केले. त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत चिमुकला कोणाला सांगू शकतो, या भीतीने मारहाण करून गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. रविवारी (दि. २५) ही घटना उघडकीस आली.
पवन जोगेश्वरप्रसाद पांडे (वय ३१, रा. उत्तमनगर, बावधन, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. मृत मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील बांधकाम मजूर आहेत. पत्नी आणि चार मुलांसह ते वाकड येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि. २४) सायंकाळी त्यांचा आठवर्षीय मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. पोलिसांनी सुरुवातीला अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला. वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगा एका संशयित व्यक्तीसोबत पायी जाताना दिसला. पोलिसांनी संशयित पवन याची ओळख पटवून त्याला बावधन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे सांगितले.
दरम्यान, पवन बावधन येथे दीड महिन्यापूर्वी आला. तीन दिवसांपूर्वीच वाकड येथे रसवंतिगृहात तो कामाला आला. तो आठवर्षीय मुलाला उसाचा रस प्यायला द्यायचा. शनिवारी सायंकाळी मुलगा खेळत होता. त्याने मुलाला वडापावचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याला बावधन येथे नेले. पाषाण तलावाजळ त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. मुलगा अत्याचाराबाबत कोणालाही सांगू शकतो, या भीतीने पवन याने मारहाण करून त्याचा गळा आवळला. यात मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा मृतदेह झुडुपामध्ये टाकून दिला.
रसवंतिगृह मालकावर कारवाई
रसवंतिगृह मालकाने पवनला कामावर घेताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केली नाही. कामगारांची पोलिसांना माहिती दिली नाही. यामुळे या मालकावर पोलिसांनी कारवाई केली.