- किरण शिंदे
पुणे - ३१ डिसेंबरच्या रात्री परवानगी न घेता पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी कल्याणीनगर परिसरातील युनिकॉन हाऊस हॉटेलचे मालक आणि मॅनेजर यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप सहस्त्रबुद्धे आणि निखिल अशोक वंजारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस शिपाई स्वप्निल मराठे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र ही परवानगी देतानाच राज्य शासनाने काही अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या. मात्र शहरात अनेक ठिकाणी या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. कल्याणी नगर परिसरात असणाऱ्या युनिकॉन हाऊस हॉटेलमध्ये शासनाची परवानगी न घेता साऊंड सिस्टिम वाजवण्यात आली होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
हॉटेलचे मालक संदीप सहस्त्रबुद्धे आणि मॅनेजर निखिल वंजारी यांना राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांची माहिती असतानाही त्यांनी नियमांचे उल्लंघन करत साऊंड सिस्टीम वापरली. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी मध्यरात्रीच कारवाई करत साऊंड सिस्टिम जप्त केली आणि या दोघांवरही भारतीय न्याय संहिता २२३ ३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ क्ष आर/डब्लू १३१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील अधिक तपास करत आहेत.