PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीत आम्हाला बारा जागा द्याव्यात; केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:08 IST2025-12-22T13:08:26+5:302025-12-22T13:08:50+5:30
Pune Municipal Election 2026: महायुती आता परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदारी वाढवू नका, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले आहे

PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीत आम्हाला बारा जागा द्याव्यात; केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची मागणी
पुणे: रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा साथीदार व महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदारी वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. तर पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी देखील केली.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने आश्रम मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर अशोक कांबळे, अशोक गायकवाड, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, शाम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विशाल शेवाळे, मातंग आघाडीचे विलास पाटोळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत. येणाऱ्या सत्तेत योग्य वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने आरपीआयचे कार्यकर्ते व महिलांची संख्या लक्षणीय होती.