सराईत गुन्हेगारावर एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; १० महिन्यात ३१ कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 21:47 IST2021-07-24T21:46:15+5:302021-07-24T21:47:47+5:30
दिनेश वांजळे हा उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; १० महिन्यात ३१ कारवाई
पुणे : उत्तमनगर परिसरातील नागरिक, विक्रेते व व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईचा आदेश दिला.
दिनेश किसन वांजळे (वय २१, रा. न्यु कोपरे, हवेली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या १० महिन्यात ३१ गुन्हेगारांवर एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करुन त्यांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दिनेश वांजळे हा उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. वांजळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध वारजे माळवाडी व उत्तम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, सुरा यांसारखी हत्यारे जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखाबत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या ६ वर्षात वांजळेविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरीक त्याच्याविरुद्ध उघडपणे तक्रार देण्यात कोणी समोर येत नव्हते. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी संबंधीत गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला होता. त्यानुसार, पोलिस आयुक्त गुप्ता यांनी एक वर्षासाठी आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली