पुणे: चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा खून केल्यानंतर आरोपी स्वत: यवत पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना मामाच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. राहुल शिवाजी मिसाळ (३२, रा. यवत रायकरमळा, मूळ तांदूळवाडी, ता. माळशिरस) असे आरोपीचे नाव आहे. तर अनिता ऊर्फ कमल विक्रम लोंढे (२८, रा. भंडलकर नगरच्या पाठीमागे, शेवाळवाडी फाटा, मांजरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अनिता हिच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हडपसर पोलिसांनी मिसाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना शेवाळवाडी फाटा मांजरी येथे शुक्रवारी (दि. २३) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मिसाळ आणि खून झालेली तरुणी अनिता लोंढे हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघेही विवाहित असून, एकमेकांच्या पती-पत्नीपासून वेगळे राहतात. राहुल मजुरीकाम करतो. गेल्या काही दिवसांपासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. परंतु, राहुल हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गुरुवारी रात्री तो अनिताच्या शेवाळवाडी फाटा येथील घरी आला होता. त्यांच्यात परत वाद झाला. त्यातूनच राहुलने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अनिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर राहुलने तेथून पळ काढला होता. काही वेळानंतर तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने आपण स्वत: मामाची मुलगी अनिता हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. ही माहिती यवत पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अनिता ही मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी अनिताच्या नातेवाइकांना ही माहिती दिली. त्यानंतर तिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.